स्वामी समर्थ मठातील उत्सव आणि कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ

हिरव्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या वसई तालुक्यात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. निर्मळ येथे आद्य श्री शंकराचार्यांची समाधी असून तेथे मंदिर आहे. तेथून जवळच अंदाजे २ कि.मी.वर श्री दत्तडोंगरी हे जागृत देवस्थान आहे. निर्मळजवळील वाघोली येथे अगदी अलीकडेच बांधण्यात आलेले आणि प्रति शनिशिंगणापूर म्हणून नावारूपाला आलेले शनिमंदिर आहे. याच पुण्यपावन परिसरातील भुईगाव या गावी श्री स्वामी समर्थ मठ आहे. निर्मळजवळील भुईगाव या अगदी छोटयाशा गावात श्री. संदीप म्हात्रे यांच्या घरी श्रावणातल्या पहिल्या गुरुवारी म्हणजे दि. ३१ जुलै २००२ रोजी "श्री स्वामी समर्थ" उपासना सुरु झाली. नंतर दर गुरुवारी हि उपासना नियमित होत राहिली. सुरवातीच्या काळात या उपासनेला जमलेल्या १०-१२ भक्तांची संख्या हळूहळू १०० च्या वर पोहचली. उपासनेसाठी घरची जागा कमी पडू लागली. यावर श्री. संदीप म्हात्रे यांनी उपासनेसाठी एक कायमस्वरूपी जागा असावी असा विचार सर्वासमोर मांडला. आपल्या घराशेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत हि वास्तू बांधावी असा विचार संदीपदादानी सर्वाना सांगितला. दादांच्याच संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने आज उभ्या असलेल्या मठाची उभारणी करण्यात आली. मठाची स्थापना आणि "श्री" ची प्राणप्रतिष्ठा माघ शु. १२ अर्थात १२ फेब्रुवारी २००८ या शुभदिनी झाली. मठात येण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वसई आणि नालासोपारा या स्टेशनपासून एसटी बसची सोय आहे. मठात केवळ केवळ वसई तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे, मुंबई, डहाणू, पालघर, कल्याण, अंबरनाथ, शहापूर अशा विविध ठिकाणाहून भक्तगण दर्शनासाठी येत असतात.

सात्विक विचारांच्या पायावर उभारलेले हे देवस्थान हळूहळू वाटचाल करीत प्रगतीपथावर गेले. आजपर्यंतच्या ९ वर्षाच्या काळात मठाने अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम घेऊन संतसेवेचा आदर्श घालून दिलेला आहे.

अध्यात्मा पलीकडे जाऊन सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक विचारांची बैठक समाजात रुजावी आणि एक चांगला समाज घडावा हे मठाचे उद्दिष्ट आहे. जे जे उत्तम आणि उदात्त आहे ते सर्व उपक्रम सुरु करण्याचा या मठाचा मानस आहे.

प. पु. श्री जनार्दनस्वामी, करवीरपीठाधीश शंकराचार्य, वेदमुनी धनंजयशास्त्री वैद्य, चोळाप्पा महाराजांचे वंशज प.पू मोहनमहाराज,प.पू अण्णू महाराज, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यासारख्या महानुभवांनी मठाला आशीर्वाद दिले. समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, नर्मदा परिक्रमाकार जगन्नाथ कुंटे, पंचांगकर्ते मोहनबुवा दाते, निरुपणकार सुनील चिंचोलकर, डॉ. हेरंबराज पाठक यांसारख्या विद्यासंपन्न आणि पूजनीय प्रभुतींनी मठात संत साहित्यातील विविध पैलूंवर भाष्य करून वेळोवेळी उपस्तिथ अमठातील उत्सवाऱ्या भक्तगणांना मार्गदर्शन केले.

सर्वश्री विवेक घळसासी, भुमकार सर, धनराज वंजारी, प्रा. धनंजय चितळे, डॉ. यशवंत पाठक, अपर्णाताई रामतीर्थकर यांसारख्या व्याख्यातांनी आपल्या ओघवत्या शैलीतून श्रोत्यांना अध्यात्मिक साहित्य आणि विज्ञान यांचा असलेला परस्पर संबंध सांगून प्रबोधन केले. अनाथांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या अनुभवातून श्रोत्यांशी हितगुज केले. अजित कडकडे, पदमजा फेणाणी, राजा रामसिंग, दत्तात्रय मेस्त्री, स्मिता जोशी, संबळवादिका सुलभा सावंत यासारख्या संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी आपली संगीतसेवा "श्री" चरणी अर्पण केली. नारदीय कीर्तनशैलीचा समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे आणि हे महत्त्व ओळखून मठात दर महिन्याच्या पौर्णिमेला नामवंत किर्तनकारांची किर्तन आयोजित केली जातात. आजवर अनेक मान्यवर किर्तनकारांनी आपली सेवा मठाला दिली आहे.

प्राथमिक वैद्यकीय चिकित्सा, नेत्र चिकित्सा, रक्तदान, सुवर्ण प्राशन संस्कार यांसारखी शिबिरे मठात आयोजित केली गेली. याकरिता भक्तिवेदांत रुग्णालय, मिरारोड आणि हायटेक ब्लड बँक, मालाड यांसारख्या संस्थांनी सहकार्य केले. या सर्व वैद्यकीय शिबिरांना भरपूर प्रतिसाद मिळाला. प्रत्येक सोहळ्याच्यावेळी "श्री" वर रुद्राभिषेक, दर शनिवारी ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांसोबत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड नामस्मरण सप्ताह असे वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम मठात होत असतात. मठात वर्धापनदिन (माघ शु. १२), श्री स्वामी समर्थ प्रकटदिन (चैञ शु. २), श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी (चैत्र व. १३), गुरुपौर्णिमा (आषाढ पौर्णिमा) आणि श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधीमठातील स्वयंभू पादुकांचा दर्शन सोहळा असे सहा उत्सव आयोजित करण्यात येतात. प्रत्येक उत्सवाला हजारो भाविक दर्शनाचा आणि महाप्रसाद (भंडारा) चा लाभ घेतात. समर्थ महाप्रसादलयाचे बांधकाम पूर्ण होऊन दर गुरुवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

“श्रीस्वामी समर्थ साधक निवास” - आध्यात्मिक गुरु,संतगण,प्रवचनकार,कीर्तनकार व परगावातील भक्तगणांसाठी राहण्यासाठी दोन प्रशस्त खोल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्रैमासिक “स्वामीचरणतीर्थ” - श्री स्वामी समर्थ सेवा परिवार संचालित, सिद्धहस्त व नामवंत लेखकाच्या लेखणीतून प्रकट झालेले संतांचे विचार,ज्ञानप्रबोधनास वाहिलेले व अल्पावधीत प्रसिद्ध झालेले त्रैमासिक "स्वामीचरणतीर्थ" प्रकाशित करण्यात येत आहे. ज्ञानयत्नच्या या ज्ञान दिंडीत आपणही सहभागी व्हावे हि अपेक्षा.

आगामी काळात भुईगाव ते अक्कलकोट पदयात्रा, गोमाता प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वाचनालय, मान्यवरांच्या व्याख्यानमाला या आणि अशा प्रकारच्या अनेक योजना प्रत्यक्षात साकार करावयाच्या आहेत. सतत सहकार्य करणारे सेवेकरी, भक्तमंडळींचे प्रेम आणि पंचकोशीतील समस्त ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हे कार्य करणे शक्य होत आहे. "अशक्यही शक्य करतील स्वामी" व "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" या स्वामी वचनावर मठाचा पूर्ण विश्वास आहे.

!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

अधिक माहितीसाठी संपर्क : ९९३०६०७५५०


संदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष

जलद मेनू


ताजी बातमी


Visitors Count
Reach Us
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ